दादी प्रकाशमणी यांच्या १९व्या स्मृतिदिनानिमित्त राहुरीत रक्तदान शिबिर
प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
राहुरी, दि. २५ : ब्रह्माकुमारीज राहुरी सेवा केंद्राच्या वतीने राजयोग भवन येथे ब्रह्माकुमारी दादी प्रकाशमणी यांच्या १९व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास राहुरी शहर व तालुक्यातील नागरिक, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, युवक तसेच ओम शांती परिवारातील बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात दादी प्रकाशमणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुमनांजली वाहण्याने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथील डॉक्टर व त्यांच्या पथकाने रक्तसंकलनासाठी आवश्यक व्यवस्था केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान करण्यात आले.

सेवा केंद्राच्या संचालिका नंदादीदी यांनी आपल्या प्रवचनातून नशामुक्ती अभियानाचे महत्त्व सांगितले. ब्रह्माकुमारीज विद्यालय व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने देशभर नशामुक्ती अभियान राबविण्यात येत असून, नागरिकांना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसन ही समाजाला लागलेली गंभीर समस्या असून, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचावासाठीही जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रक्तदान हे जीवनदान असून प्रत्येक पात्र व्यक्तीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राहुरी तालुक्याचे पोलीस अधीक्षक रविंद्र देशमुख यांनी शुभेच्छा देताना व्यसनामुळे तरुण पिढीचे मोठे नुकसान होत असून त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. ब्रह्माकुमारीज संस्थेच्या नशामुक्ती अभियानाचे त्यांनी कौतुक केले.
राहुरी तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रसाद ढूस यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना, एका व्यक्तीने केलेल्या रक्तदानामुळे तीन गरजू रुग्णांना मदत होऊ शकते, असे सांगितले. रक्तदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. राहुरी तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार कर्णा जाधव, पत्रकार श्री. राजेंद्र परदेशी, पत्रकार श्री. मकासरे, पत्रकार श्री. प्रसाद मैड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, प्रसाद व ब्रह्माकुमारीज संस्थेचे साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तीपत्रक व रक्तदानाचे महत्त्व सांगणारे साहित्य देण्यात आले. तसेच सेवा केंद्राच्या वतीने रक्तदात्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. प्रदीप रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंत तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिरात ब्रह्माकुमारीजचे भाऊ-भगिनी, शिक्षकवर्ग, व्यापारी, शेतकरी, युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दादी प्रकाशमणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.








