संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पळशी झाशी येथे साडेसहा लाखांची घरफोडी; पोलिसांच्या वचकावर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी : उज्वल जैस्वाल
संग्रामपूर (तालुक्यातील) दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळशी झाशी येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून तब्बल ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांवर पोलिसांचा धाक किंवा वचक राहिलेला आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास श्रीकृष्ण मारोडे (वय ४६, व्यवसाय कंत्राटदार, रा. पळशी झाशी, ता. संग्रामपूर) हे घराबाहेर असताना १९ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते २० ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील दोन लोखंडी अलमारींचे लॉकर फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरून नेला. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १९१ ग्रॅम सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच एक लाख रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे ५ लाख ३४ हजार ८०० रुपये, चांदीच्या दागिन्यांची किंमत १० हजार रुपये, तर रोख एक लाख रुपये अशी एकूण ६ लाख ४४ हजार ८०० रुपयांची चोरी झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात कायमी गुन्हा क्रमांक २८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ करीत आहेत.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा सवाल पळशी झाशी परिसरात घरफोडीची एवढी मोठी घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्यानेच चोरीच्या घटना वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पोलिसांकडून रात्रीची गस्त, संशयित व्यक्तींची तपासणी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई होत आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच परिसरात चोरी व इतर गुन्हेगारी घटनांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या घरफोडीचा तातडीने छडा लावून आरोपींना अटक करावी, तसेच परिसरातील रात्रीची गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित व्यक्ती आणि चोरीच्या मालाच्या विक्रीच्या संभाव्य मार्गांचा तपास केला जाण्याची शक्यता आहे.








