सावदा पोलिसांची धडक कारवाई; गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त, दोघांना अटक
प्रतिनिधी : बशीर तडवी
जळगाव : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची बेकायदेशीर व निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या वाहनावर सावदा पोलिसांनी रविवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वाहनातून सुटका करण्यात आलेल्या दोन गोवंशांना पशुवैद्यकीय तपासणीनंतर गोशाळेत पाठविण्यात आले.

दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सावदा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मोहसीन रहेमान पठाण व निलेश बाविस्कर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सावदा शहरातील ख्वाजा नगरसमोरील मरीमाता मंदिराजवळून गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन जाणार आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री सुमारे ८.५० वाजता सापळा रचला. यावेळी ख्वाजा नगरकडून येणारे पिवळ्या रंगाचे टाटा एस वाहन (क्र. MH 48 AG 5804) संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता मागील बॉडीमध्ये एक गाय व एक गोऱ्हा हालचालीसाठी पुरेशी जागा नसताना अत्यंत निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.
या प्रकरणी अदनान शेख शगीर कुरैशी (वय १९, रा. इस्लामपुरा, खाटकीवाडा, सावदा) आणि निलेश रमेश पाटील (वय ४४, रा. टेलिफोन एक्सचेंजजवळ, सावदा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत १५ हजार रुपये किमतीची सुमारे आठ वर्षांची तांबड्या रंगाची गाय, १५ हजार रुपये किमतीचा सुमारे पाच वर्षांचा पांढऱ्या रंगाचा गोऱ्हा आणि ३ लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहन, असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींकडे जनावरांच्या खरेदी-विक्री अथवा वाहतुकीसंदर्भातील कोणतेही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. दोन्ही गोवंशांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत दाखल करण्यात आले.
याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०२१९/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारणा २०१५) कलम ५(अ), ९, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१)(d), ११(१)(g), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ११९ तसेच मोटार वाहन नियम १९८९ कलम ८३, १७७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड, मोहसीन पठाण, निलेश बाविस्कर, जाकीर मन्सुरी व सुनील सैंदाणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास जाकीर मन्सुरी करीत आहेत.








