कोठारीत पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; पोलीस भरतीचे स्वप्न अधुरेच!
करण पंडित जाधवच्या दुर्दैवी मृत्यूने मांडवी-कोठारी परिसरात हळहळ
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरमवार
नांदेड (किनवट) : दि. २५ ऑगस्ट २०२६, तालुक्यातील कोठारी येथे नाल्यावरील पुलाखाली पोहण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय करण पंडित जाधव याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे मांडवी-कोठारी परिसरावर शोककळा पसरली असून, तरुणाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करण पंडित जाधव हा कोठारी येथील नाल्यावरील पुलाखाली पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
करण हा तरुण पोलीस भरतीची तयारी करीत होता. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी तो मेहनत घेत होता. मात्र, काळाने घातलेल्या या दुर्दैवी घावामुळे त्याचे देशसेवेचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले.
करणच्या अकाली निधनाची बातमी परिसरात समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. एका होतकरू तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.








