चिंचोली पेट्रोल पंपावर जुन्या वादातून झटापट; जीवे मारण्याच्या धमक्यांचा आरोप
प्रतिनिधी : बशीर तडवी
जळगाव (यावल) : चिंचोली येथील पेट्रोल पंपावर जुन्या वादातून मारहाण व झटापट झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी काही व्यक्तींनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप समाधान दिगंबर धनगर यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम अरुण पाटील, पोलीस पाटील राकेश वासुदेव साठे आणि संतोष अरुण बडगुजर यांच्यासह काही व्यक्ती पेट्रोल पंपावर आल्या. यावेळी झटापट व मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती रिक्षा व ॲपे रिक्षामधून आल्या असून, त्यांच्याकडे कुऱ्हाडी तसेच इतर धारदार हत्यारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या सोबत सुमारे १५ ते २० जणांचा जमाव असल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.
या घटनेदरम्यान समाधान दिगंबर धनगर यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर धनगर यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनेनंतर समाधान धनगर हे यावल पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी मानसिक संतापाच्या अवस्थेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला . यावेळी पोलीस ठाण्यातील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगत शांत केले. “मला न्याय मिळत नाही. न्याय मिळाला नाही तर मी आत्मदन करणार,” अशी भूमिका त्यांनी पोलिसांसमोर मांडल्याचे सांगण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच आपल्याला संरक्षण व न्याय मिळावा, अशी मागणी समाधान दिगंबर धनगर यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून चौकशी होणे आवश्यक असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सत्य परिस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








