टाकळीभानचा अस्लम इनामदार आशियाई प्रतिनिधित्व करणार क्रीडा स्पर्धेत भारताचे
प्रतिनिधी : संदीप जाधव
टाकळीभान : अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळीभानचा स्टार कबड्डीपटू अस्लम इनामदार याची जपानमधील आयची नागोया येथे होणाऱ्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कबड्डी संघात निवड झाली आहे.
१९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे. भारतीय संघात १२ खेळाडूंचा समावेश असून अस्लमसोबत आशु मलिक, अयान लोहचब, देवांक दलाल, अर्जुन देशवाल, सुनील कुमार, जयदीप दहिया, राहुल सेथपाल, गौरव खत्री, सुमित सांगवान, अंकित जगलान आणि पवन सेहरावत यांची निवड झाली आहे.
अस्लम आणि पवन सेहरावत यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. अस्लमने यापूर्वी २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले होते. यंदाही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. खेलो इंडिया, राज्य व राष्ट्रीय अजिंक्यपद तसेच प्रो कबड्डी स्पर्धांमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कारानेही त्याचा गौरव झाला आहे. अस्लमच्या निवडीचे वृत्त समजताच टाकळीभान येथे कबड्डीपटू, क्रीडाप्रेमी, युवक व ग्रामस्थांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत त्याचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, जिल्हा कबड्डी संघटना, ओन्ली साई क्रीडा मंडळ, आझाद क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थांनी अस्लमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








