नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात एलपीजी सिलेंडर वितरण कालावधी २५ दिवस करा आणि काळाबाजार थांबवा
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी : मारोती एडकेवार
नांदेड: जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या एलपीजी गॅस सिलेंडर वितरणात मोठी विसंगती दिसून येत असून, शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही सिलेंडर मिळण्याचा कालावधी 25 दिवस करण्यात यावा, तसेच गॅस सिलेंडरचा होणारा काळाबाजार तात्काळ थांबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने 25ऑगस्ट 2026 रोजी नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात दर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर दिला जातो. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना तब्बल 45 ते 55 दिवसांनंतर सिलेंडर दिला जात आहे. ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे ही मोठी व संयुक्त असल्याने एक गॅस सिलेंडर साधारणपणे 30 दिवसांच्या आत संपतो. त्यामुळे उर्वरित 15 ते 25 दिवसांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठी फरफट सहन करावी लागत आहे.
या बिकट परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही गैरप्रवृत्तीचे लोक शहरातून 25 दिवसांच्या मुदतीचे सिलेंडर उचलतात आणि ग्रामीण भागात आणून ते चढ्या दराने, म्हणजेच अडीच ते तीन हजार रुपयांना विकत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गरीब जनतेची मोठी आर्थिक लूट होत असून गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे.वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे प्रामुख्याने खालील मागण्या केल्या आहेत.
1) ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुद्धा गॅस सिलेंडर वितरणाची मुदत 45 ते 55 दिवसांवरून कमी करून ती शहराप्रमाणे 25 ते 30 दिवस करण्यात यावी.
2) शहरातून सिलेंडर आणून ग्रामीण भागात चढ्या दराने विकणाऱ्या टोळ्यांवर आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव दिपक रुद्राजी मगर सह संघटक उत्तमराव वाढवे, जिल्हा उपाध्यक्ष के. एच. वने हतनीकर, पंढरीनाथ अहंकारे, धाराजी हिंगोली, सखाराम मामा सीतळे बंटीभाऊ मोरे सौरभ पावडे विक्रम इंगोले यांच्यासह पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला या समस्येतून तातडीने बाहेर काढून योग्य तो तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.








