धामणदरी येथील सरपंच व ग्रामसेवकाच्या गैरकारभाराची चौकशी करा
“नागरिकांची किनवटच्या गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार”
प्रतिनिधी: मार्कंडेय सिरमवार
किनवट :दि. २६ ऑगस्ट २०२६, तालुक्यातील मौजे धामनदरी येथे १५ वा वित्त आयोग, तांडावस्ती,ठक्कर बाप्पा, दलितवस्ती सुधार योजना आणि पेसा योजनेअंतर्गत लाखो रु चा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला असुन याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद शिरसेवाड, सरपंच परसराम आतराम आणि संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्यावर तत्काळ कायदेशीर व दखलपात्र कारवाई करून त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले की मागील ४ वर्षांच्या कालावधीत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी कोणतीही प्रत्यक्ष ग्रामसभा किंवा मासिक सभा न घेता परस्पर कागदोपत्री बोगस ठराव दाखवून लाखो रुपयांचा निधी उचलला आहे.सिमेंट रस्ते, बंदीस्त नाली, सार्वजनिक पाणीपुरवठा, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, शुद्ध जलपुरवठा आणि ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत अर्धवट व फक्त कागदावर कामे दाखवून निधी उचलून शासनाची व गावकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी शिरसेवाड हे गावात नियमित उपस्थित राहत नसून विविध शासकीय प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना किनवटला बोलावून पैशांची मागणी करतात. तर सरपंच परसराम आतराम हे ग्रामसभा घेण्याचे लेखी आश्वासन देतात, परंतु “कोरम पूर्ण नाही” असे सांगून सभा तहकूब करतात. त्यानंतर तहकूब सभा कागदोपत्री दाखवून आर्थिक वर्षाचा ताळेबंद बोगस ठरावाद्वारे मंजूर करून घेतात. स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट ऐवजी १६ ऑगस्ट रोजी सभेची नोटीस काढण्यात आली होती. मात्र, कोरम अभावी ती सभा २४ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्याचे ठरले होते. २४ ऑगस्ट रोजी गावातील नागरिक सभेसाठी उपस्थित राहिले, मात्र सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी स्वतःच अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकासकामे ठप्प झाली असल्यामुळे त्यांच्या गैरकारभाराची ८ दिवसांत सखोल चौकशी करून कडक कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा धामनदरी येथील समस्त नागरिकांनी दिला आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड आणि उपविभागीय अधिकारी किनवट यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे. निवेदनावर धामणदरी येथील अर्जुन प्रेमसिंग राठोड, अमय ईश्वरा जाधव, आकाश विष्णू राठोड, सागर सुहास राठोड, प्रद्युमन प्रेमसिंग राठोड, लखन अशोक पवार, शुभम विनोद राठोड, भगवान तुकाराम कांबळे, विक्रम अशोक पवार, पवन पंडीत कुमरे यांच्यासह ३० हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








