एका गुरूचे दोन शिष्य; पुरस्काराच्या व्यासपीठावर तिघांचाही एकत्र सन्मान!
प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
देवळाली प्रवरा : दि. २७ ऑगस्ट २०२६, पत्रकारिता क्षेत्रात गुरूने दिलेले संस्कार आणि शिष्यांनी आपल्या कर्तृत्वातून मिळवलेली ओळख यांचा अनोखा संगम लवकरच शिर्डीत पाहायला मिळणार आहे. पत्रकारितेतील गुरुवर्य सुधाकरराव कराळे तथा ‘अंकल’ आणि त्यांचे शिष्य रफीक शेख व राजेंद्र उंडे यांची इच्छापूर्ती प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय ‘इच्छापूर्ती गौरव – आदर्श पत्रकारितारत्न’ पुरस्कारासाठी एकाचवेळी निवड झाली आहे.
गुरूने शिकविले, शिष्यांनी नाव कमावले आणि आता गुरू-शिष्यांचा एकाच व्यासपीठावर सन्मान होणार असल्याने या पुरस्कार सोहळ्याची पत्रकारिता क्षेत्रात विशेष चर्चा रंगली आहे. एका गुरूचे दोन शिष्य आणि तिघांचाही एकाचवेळी होणारा सन्मान हा या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेत इच्छापूर्ती प्रतिष्ठानच्या निवड समितीने सुधाकरराव कराळे, रफीक शेख आणि राजेंद्र उंडे यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अनुकरणीय असून, त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. संपतराव जाधव यांनी दिली. या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून गुरु-शिष्य त्रिकुटाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिर्डी येथील हॉटेल साईधन येथे आयोजित करण्यात आला आहे. विविध राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या सोहळ्यास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव कदम, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महंत उद्धवजी महाराज मंडलिक, अक्षयजी महाराज भोसले, ज्ञानेश्वर महाराज जवळेकर, पांडूरंगगिरीजी महाराज वावीकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डीले, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख दक्षिण बाबुशेठ टायरवाले, जिल्हाप्रमुख उत्तर नितीन औतडे, कमलाकर कोते, सुरेशसेठ वाबळे, सिनेअभिनेत्री सुनिता कोते, प्रतिक्षा आगळे यांच्यासह राजकीय व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश भांड, सचिव दत्तात्रय गागरे यांच्यासह सर्व सदस्यांनी नागरिकांनी व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी या पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
गुरूचे संस्कार, शिष्यांचे कर्तृत्व आणि तिघांचाही एकाच मंचावर गौरव—हा अनोखा संगम शिर्डीतील पुरस्कार सोहळ्याची विशेष ओळख ठरणार आहे.








