रायपूरमध्ये ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश
जुलूसवर पुष्पवृष्टी, शरबत-मिठाईचे वाटप; नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने सामाजिक सलोख्याचे दर्शन
प्रतिनिधी: उज्वल जैस्वाल
रायपूर : रायपूर गावात ईद-ए-मिलादुन्नबीचा सण उत्साह, आनंद आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त गावातून भव्य जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मुस्लिम बांधवांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
जुलूस गावातील विविध भागांतून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी नागरिकांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. विशेष म्हणजे हिंदू बांधवांनी पुढाकार घेत जुलूसवर गुलाबपुष्पांची उधळण करून मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. फुलांचे गुच्छ देऊन सहभागी नागरिकांचे स्वागत करण्यात आले.
जुलूसमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी विविध ठिकाणी थंड पाणी, शरबत, मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी सहभागी नागरिकांना अत्तर व परफ्यूम लावून आपुलकीने स्वागत करण्यात आले. या पाहुणचारामुळे उत्सवातील आनंद अधिकच द्विगुणित झाला.
यावेळी डॉ. बाहेती, बालाप्रसाद जयस्वाल, अभीमान घोलप, लक्ष्मण काकडे, अनुप अहीर, निलेश राजपूत, ग्यायदेव सोनुने, अशोक फोलाने, जगदिश चौथे, संतोष भोसले, सुरेश देशमाने, संजय गांडोळे यांच्यासह गावातील अनेक नागरिकांनी जुलूसचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या सोहळ्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या सणाचा आनंद सामायिक करत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले. लहानांपासून वृद्धांपर्यंत नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने संपूर्ण रायपूरमध्ये बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘सण वेगळे असले तरी माणुसकी आणि बंधुभाव एकच’ असा संदेश देणारा रायपूरचा हा सोहळा सामाजिक सलोख्याचा आदर्श ठरला. हिंदू-मुस्लिम ऐक्याची गावातील ही परंपरा संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.








