जळगाव नेऊरला आईच्या स्मरणार्थ शेतात २५ आंब्याची लागवड.
रविवारी जलदान विधी कार्यक्रम प्रसंगी १०० आंब्याच्या झाडांचे होणार वाटप
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
जळगाव नेऊर ता येवला येथील सिंधुबाई पंढरीनाथ वाघ यांचे वयाच्या ८० व्या वर्षी व १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० व्या स्वातंत्र्यदिनी वृद्धापकाळाने निधन झाले.वाघ परिवाराने आईच्या अस्थी व राख विसर्जन न करता त्यातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.आईच्या स्मृती जपण्यासाठी मुलांनी शेतात २५ आंब्याची झाडे लावून त्या झाडांना आईची राख अर्पण करण्यात आली.या माध्यमातून मातृप्रेम,पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा अनोखा संगम साधण्यात आला आहे.आईच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पुढील पिढीला पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा मिळावी,या उद्देशाने वाघ परिवाराने हा उपक्रम राबविला आहे.“आईच्या स्मृतींना विसर्जन न करता वृक्षरूप देणे” हा विचार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ,सुभेदार मेजर विशालसाहेब वाघ, पत्रकार बापूसाहेब वाघ आदी मुलांनी व समस्त वाघ परिवाराने केला.
या उपक्रमाच्या अनुषंगाने रविवार ता.२३ रोजी जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रमाच्या प्रसंगी १०० आंब्याची (कलमी रोपे) वाटप करण्यात येणार आहेत.तसेच आईच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव नेऊर व जनता विद्यालय जळगाव नेऊर शाळेत वृक्षारोपणासाठी शोभेची झाडे देण्यात येणार आहेत.आईच्या आठवणी केवळ मनात न ठेवता त्या वृक्षांच्या रूपाने जिवंत ठेवण्याचा वाघ परिवाराचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.आगामी काळात या रोपांचे संगोपन करून त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर करण्याचा संकल्पही वाघ परिवाराने केला आहे.वृक्षारोपण प्रसंगी सुनबाई लीलाबाई वाघ,अनिता वाघ, वनिता वाघ,मुली सुनीता निकम,अलका आहिरे, नलिनी उबाळे,मालती बागुल,पोलिस सिद्धार्थ वाघ (नातु),नातसुन प्रतीक्षा वाघ,नात ज्योती शेजवळ,प्रणाली वाघ,नातु प्रणव वाघ,यशराज वाघ,विराज वाघ,रितिशा वाघ(पणती),अद्विक शेजवळ (पणतू),नातु विलास आहिरे,राहुल ऊबाळे,मनिष बागुल,संतोष वाघ आदी उपस्थित होते.
फोटोखाली-जळगाव नेऊर येथे आईच्या स्मरणार्थ आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण करताना वाघ परिवार.








