उक्कलगाव परिसरात विजेचा लपंडाव
प्रतिनिधी : रोहित जोशी
उक्कलगाव : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहेत. अशा बिकट परिस्थितीत विजेचा लपंडाव आणि अतिरिक्त भारनियमनाचा मोठा फटका परिसरातील पिकांना बसत असून, शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहेत. शेतीपंपाचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची आक्रमक मागणी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव, गळनिब आणि पटेलवाडी परिसराला बेलापूर व ममदापूर येथील वीज केंद्रातून वीजपुरवठा होतो. मात्र, विजेचा तुटवडा निर्माण झाल्याचे कारण देत महावितरणकडून
अचानक अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. सध्या खरिपातील कपाशी, मका, कांदा यांसारखी पिके जोमात असताना आणि दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचे संकट ओढवलेले असताना, शेतीपंपांना मिळणाऱ्या आठ तासांच्या विजेतून प्रत्यक्षात केवळ सहा ताससुद्धा सुरळीत वीज मिळत नाही.
परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे अशक्य झाले आहे. अनुभवी कर्मचारी नियुक्त करा ! उक्कलगाव सबस्टेशनमध्ये काही महिन्यांपूर्वीच कंत्राटी कर्मचारी गणेश थोरात या कर्मचाऱ्याचा ऑपरेटर च्या हलगर्जीपणाच्या कारभारामुळे वीजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. मयत थोरात यांना उक्कलगाव परिसरातील वीज वितरणाचा आणि वीजवाहिन्यांचा चांगला अनुभव होता.
त्यांच्या जागी आता परिसराची संपूर्ण माहिती असणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी उक्कलगावकरांनी महावितरण प्रशासनाकडे केली.








