मुर्तिजापूर मधील सोनोरीजवळ सफारीचा भीषण अपघात; पाच जणांना एअरबॅग मुळे मिळाले जीवदान!
प्रतिनिधी : मिलिंद इंगळे
अकोला : राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनोरीजवळ आज दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास सफारी वाहनाचा भीषण अपघात झाला. बोरगाव मंजूहून मूर्तिजापूरकडे येत असताना MH 30 BW 9994 क्रमांकाच्या सफारी वाहनावरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन थेट महामार्गालगतच्या सुरक्षा भिंतीवर जोरदार आदळले. धडकेनंतर वाहन पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघाताची तीव्रता पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, वाहनातील चारही एअरबॅग वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला, अशी प्राथमिक माहिती आहे. वाहनात एका लहान मुलीचाही समावेश होता. तिलाही दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या अपघातात विहा मलया, साजिद, सपना अजमेरा, लिखित अजमेरा आणि दिपा मलया हे पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य शुभम कंडाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहनातील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले.
दरम्यान, पथकाचे प्रमुख योगेश विजयकर तसेच मूर्तिजापूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी करून घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
नेमका अपघात कशामुळे झाला? चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सफारी वाहन सुरक्षा भिंतीवर आदळून पलटी झाल्यानंतरही एअरबॅगमुळे प्रवाशांचा जीव वाचल्याने या सुरक्षा यंत्रणेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली.








