प्रधानमंत्री आवास योजना/विविध घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजूर असलेली वाढीव ₹५०,००० रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यात अदा करा
प्रतिनिधी : समीर बल्की तालुका
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना तसेच विविध घरकुल योजनेंतर्गत अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहे. शासनाच्या नियमानुसार घरकुलासाठी मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढीव ₹५०,००० रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
मात्र, अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप ही वाढीव ₹५०,००० रक्कम त्यांच्या बँक खात्यात प्राप्त झालेली नाही. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यास लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पात्र घरकुल लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ तपासून, शासनाकडून उपलब्ध असलेली वाढीव ₹५०,००० रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात विलंब न करता अदा करण्यात यावी. तसेच कोणत्या कारणामुळे रक्कम प्रलंबित आहे, याची तालुकानिहाय माहिती घेऊन संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतींना आवश्यक निर्देश देण्यात यावेत.
माझ्या प्रमुख मागण्या : पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाढीव ₹५०,००० रक्कम तात्काळ अदा करावी.
प्रलंबित लाभार्थ्यांची तालुकानिहाय व ग्रामपंचायतीनिहाय यादी तयार करून निधी वितरित करावा.
तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.
लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास अनावश्यक विलंब होणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
सदर निधी वितरणाबाबतची कार्यवाही व प्रगती लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी.
गरीब व गरजू कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सदर मागणीवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्यात यावी
{अशोक ज्ञानेश्वर चौधरी
उपसरपंच, ग्रामपंचायत शंकरपूर)








