मधापुरीत प्रेमसंबंधातून तरुणाचा विहिरीत मृत्यू; तरुणी बचावली, नंतर विषप्राशन केल्याची माहिती — गावात तणाव
प्रतिनिधी : सुनिल वानखडे
मुर्तिजापूर : माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधापुरी येथे प्रेमसंबंधाच्या कथित प्रकरणातून एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. अनिश चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यासोबत असलेल्या तरुणीला गावकऱ्यांनी वेळीच बाहेर काढल्याने तिचे प्राण वाचले. मात्र, घरी परतल्यानंतर संबंधित तरुणीने विष प्राशन केल्याची माहिती समोर आली असून, या बाबत अधिकृत वैद्यकीय पुष्टीची प्रतीक्षा आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनिश चव्हाण याचे सानिया नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा गावात होती. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी गावाजवळील परिसरात गेले असताना काही गावकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. दोघांच्या नात्याबाबत गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर परिस्थिती चिघळली.
यानंतर दोघांनी जवळील शेतातील विहिरीत उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत तरुणीला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, अनिश चव्हाण याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर मधापुरी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गटांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला. माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकर यांनी परिस्थिती हाताळत प्राथमिक स्तरावर नियंत्रण मिळवले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार महाडिक, मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी, बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार वानखडे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी अकोल्याहून एसआरपीचे पथकही गावात दाखल झाले.
दरम्यान, अनिश चव्हाण याचा मृतदेह मुर्तिजापूर तालुका शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, विहिरीतून बचावलेल्या तरुणीने घरी आल्यानंतर विष प्राशन केल्याची माहिती समोर आल्याने या घटनेला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत किंवा तिची प्रकृती कशी आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.
नात्याबाबत विविध चर्चा; पोलिस तपासाकडे लक्ष या प्रकरणात दोघांचे नेमके नाते काय होते, त्यांनी विहिरीत उडी का घेतली आणि त्यामागे कोणते कारण होते, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. गावात दोघे बहीण-भाऊ असल्याची चर्चा असली तरी त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सध्या मधापुरीतील परिस्थिती नियंत्रणात असून गावात पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा पोलिस तपासातून उलगडा होणार आहे.








