महिलेला लुटणारे २४ तासांत जेरबंद राहाता पोलिसांची कारवाई; चार संशयितांना ठोकल्या बेड्या
प्रतिनिधी : रोहित जोशी
राहता : साधूंच्या वेशात येऊन एका महिलेची फसवणूक करून लुटमार केल्याच्या घटनेने राहाता परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राहाता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासांत चार संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.
घटना समोर आल्यानंतर राहाता पोलिसांनी उपलब्ध माहिती, व्हिडिओ तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांच्या पथकांनी विविध ठिकाणी तपास करून संशयितांचा माग काढला. अखेर पोलिसांना चारही संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले.
साधूंच्या वेशाचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रकार समोर आल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
धार्मिक वेशातील व्यक्तींवर सहज विश्वास ठेवला जातो. याचाच गैरफायदा घेत नागरिकांना हेरून त्यांच्याकडून पैसे अथवा मौल्यवान वस्तू लुटण्याचा प्रकार घडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राहाता शिर्डी परिसर धार्मिक व अध्यात्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने येथे देशभरातून भाविक, पर्यटक, साधू, वारकरी तसेच यात्रेकरूंची मोठी वर्दळ असते. त्यामुळे धार्मिक वेशाचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक अथवा लूटमार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, महिलेला लुटल्याच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत चार संशयितांना ताब्यात घेऊन राहाता पोलिसांनी तपासातील तत्परता दाखवून दिली आहे.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांनी यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का? त्यांचे अन्य साथीदार आहेत का? तसेच या टोळीने परिसरातील आणखी नागरिकांना लक्ष्य केले आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.








