ग्रामसभेत उत्तरे न देताच सरपंच सचिवांनी काढला पळ
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर तालुक्यातील चकजाटेपार ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमधून सरपंच व सचिव यांनी प्रश्नांची उत्तरे न देता ग्रामसभेतून पळ काढल्याने विकास कामात भ्रष्टाचार झाल्याच्या संशय बळावला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी चकजाटेपार येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत गावकऱ्यांनी विविध प्रश्न मांडत ग्रामपंचायतीमार्फत झालेल्या विकासकामांची माहिती, खर्चाचा तपशील तसेच संबंधित कामांची बिले ग्रामस्थांसमोर सादर करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यावेळी ग्रामसेवक आनंद मारोती गलबले आणि सरपंच रामकला कवडू चौधरी उपस्थित होत्या. मात्र, ग्रामस्थांनी विकासकामांच्या हिशोबाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर समाधानकारक माहिती न देता ग्रामसभा सोडून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे
ग्रामसभेत गावकऱ्यांनी विकासकामांचा खर्च आणि बिलांची माहिती मागितली. गावाच्या विकासासाठी आलेला निधी कुठे आणि किती खर्च झाला? कोणत्या कामासाठी किती बिल अदा करण्यात आले? याचा स्पष्ट तपशील ग्रामस्थांना मिळणे आवश्यक असल्याची भूमिका उपस्थित नागरिकांनी मांडली. मात्र, प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी ग्रामसभा सोडून जाण्याचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसभा ही गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी असताना, हिशोब विचारताच ग्रामसभा सोडून जाणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा संपूर्ण खर्च, मंजूर निधी, कामांची बिले, कामाची प्रत्यक्ष स्थिती आणि संबंधित कागदपत्रे ग्रामस्थांसमोर ठेवावीत,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता नसेल तर ग्रामस्थांच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे “हिशोब द्या, कागदपत्रे दाखवा आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे द्या” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यावेळी प्रकाश वाघमारे, निखिल नन्नावरे, पीयूष नागोशे, तुळशीराम नन्नावरे, ध्यानदेव चंदेलकर, प्रशांत गाडगे, विकास शंभरकर, राजू नागोशे, बुद्धदास मून, नागेश्वर सावसाकडे, राजेंद्र राणे, कुंदन चहांदे, अविनाश दडमल, राजविलास घुटके, अनमोल धानविजय, विलास चंदेलकर, पद्मराज चहांदे, अंश चंदेलकर, अजय गुरनुले आदी ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. आता ग्रामस्थांच्या प्रश्नांना संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाकडून काय उत्तर मिळते आणि विकासकामांचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर कधी मांडला जातो, याकडे चक जाटेपारवासीयांचे लक्ष लागले आहे.
ग्रामसभेवर ग्रामसेवक संघटनांनी बहिष्कार टाकलेला आहे ही बाब मी ग्रामसभेमध्ये नागरिकांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो पण नागरिक ऐकत नसल्यामुळे मी ग्रामसभेतून काढता पाय घेतला.
ग्रामसेवक आनंद गलबले








