चिमुरात ‘लिटिल राधा-कृष्ण’ वॉक कॉन्टेस्टचा जल्लोष; चिमुकल्यांच्या मनमोहक रूपाने जिंकली मने!
प्रतिनिधी : समीर बल्की
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चिमूर शहरात ‘लिटिल राधा-कृष्ण वॉक कॉन्टेस्ट २०२६’ या अनोख्या बालस्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. राधा-कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी आपल्या निरागस अदांनी उपस्थितांची मने जिंकली.

आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या विशेष सहकार्याने टीम राधा-कृष्णच्या वतीने २६ ऑगस्ट रोजी मिलन सभागृह, चिमूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या हस्ते, नगरसेविका वनिता मगरे यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेत तब्बल ६५ बालकलाकारांनी सहभाग घेतला. आकर्षक वेशभूषा, आत्मविश्वासपूर्ण वॉक आणि मनमोहक सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या फेरीतील ६५ स्पर्धकांमधून दुसऱ्या फेरीसाठी ३० स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत राधा वेशभूषेतील ५ आणि कृष्ण वेशभूषेतील ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली.
कृष्ण वेशभूषेत स्वरूप बनसोड याने प्रथम क्रमांक पटकावला, तर राधा वेशभूषेत चैताली स्वान हिने प्रथम क्रमांक मिळविला. यावेळी सोशल मीडिया रिल स्टार व व्हिडिओ क्रिएटर आशिष बोबडे, स्वप्निल सावसाकडे, सायली केमये, तेजस शंभरकर, जिया गिरी यांच्यासह एकूण ११ जणांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण नगराध्यक्षा गीता लिंगायत, नगरसेवक श्रेयस लाखे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी वनकर यांच्या हस्ते करण्यात आले. बालकलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्यासोबतच भारतीय संस्कृती आणि श्रीकृष्णाच्या बालरूपाची सुंदर झलक पाहायला मिळाली. कार्यक्रमाचे परीक्षण रितेश गोडे व प्रणिता काळभांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन शिवानी मंडपे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तेजस मिसार, गुरुदास ठाकरे, मनीषा घाडगे, माधुरी कावरे, श्रीहरी सातपुते, ज्योती केमये, शेखर एकोणकर आणि वैशाली शेंडे. स्वाती एकोणकर. विधी सातपुते. चेतन बघेल. हिमांशु दिघोरे. यांनी अथक परिश्रम घेतले.








