जळगावात १२,५०० रुपयांची रोकड चोरी; अवघ्या पाच तासांत तिघे ताब्यात
प्रतिनिधी: बशीर तडवी
जळगाव : शहरातील शाहूनगर परिसरातील शहू कॉम्प्लेक्स येथून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरी करणाऱ्या तिघांना जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२, व्यवसाय—मॅनेजर व दूध विक्रेता) यांच्या खिशातील १२,५०० रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार शहीदखान नजीरखान (वय २७), समीरखान मजीदखान (वय ३७) आणि एका १६ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी गोंदालाल मिल परिसरातील एका दुकानाजवळ संशयितांचा शोध घेतला. चौकशीदरम्यान त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता रोकड चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपारे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत GPSI/सुनिल पाटील, सफौ दीपक शिरसाठ, पोहेकॉ नंदलाल पाटील, भगवान पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार व भगवान मोरे यांचा सहभाग होता.








