माणिक नगरमध्ये सहा दिवसांपासून नळ कोरडे; विकासाचा दावा पाण्यातच बुडाला!
प्रतिनिधी : समीर बल्की
चिमूर शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या नगर परिषदेच्या कारभारावर माणिक नगरातील पाणीप्रश्नामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून माणिक नगर परिसरातील नागरिकांच्या नळाला पाणी आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील नागरिकांना मुबलक आणि नियमित पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजनेवर तब्बल सुमारे ₹५८ कोटींचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते. एवढा मोठा निधी खर्च करूनही नागरिकांना सलग सहा दिवस पाण्यासाठी भटकावे लागत असेल, तर या योजनेचा नेमका फायदा कोणाला झाला? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही नळ कोरडेच असतील, तर विकास नेमका झाला कुठे? असा प्रश्न आता माणिक नगरातील नागरिक विचारत आहेत. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, देखभाल आणि नियंत्रण याबाबतही नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक प्रश्न असताना सहा दिवस पाणीपुरवठा बंद राहणे ही बाब गंभीर मानली जात आहे. पाण्याअभावी नागरिकांना घरगुती वापरासाठी पाणी मिळविण्यासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विकासाच्या जाहिराती की प्रत्यक्ष सुविधा?
नगर परिषदेकडून विकासकामांच्या घोषणा आणि दावे केले जात असले, तरी नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना परिसरात निर्माण झाली आहे. रस्ते, स्वच्छता, नाल्या आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल, तर विकासाच्या दाव्यांचे वास्तव काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
₹५८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतून नेमकी कोणती कामे झाली, त्यावर किती खर्च झाला, पाणीपुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती काय आहे आणि माणिक नगरमध्ये सहा दिवस पाणीपुरवठा का झाला नाही,
याची संपूर्ण माहिती नगर परिषदेने नागरिकांसमोर पारदर्शकपणे मांडावी, अशी मागणी होत आहे.
नळाला पाणी नाही, मग कोट्यवधींचा खर्च कशासाठी?
एकीकडे कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजनेचा गाजावाजा आणि दुसरीकडे नागरिकांच्या नळाला सलग सहा दिवस पाणी नाही, ही विसंगती नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. विकासाच्या मोठमोठ्या थापा मारण्यापेक्षा नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याला प्राधान्य द्यावे, अशी संतप्त मागणी माणिक नगरातील नागरिकांकडून होत आहे.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने माणिक नगरचा पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच पाणीपुरवठा योजनेबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.








