बाळापूर तालुक्यात पावसाची मोठी तूट; शेतकरी संकटात!
प्रतिनिधी : चंदन जंजाळ
बाळापूर :- तालुक्यात यंदा पावसाचे असमान वितरण झाल्याने खरीप हंगामातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून-जुलै या दोन महिन्यांत तालुक्यात सरासरी 316.6 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना यावर्षी केवळ 278.5 मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच जून-जुलैमध्ये सरासरीच्या तुलनेत सुमारे 88 टक्के पाऊस झाला असून जवळपास 12 टक्के तूट राहिली आहे. त्यातही पावसाचे वितरण समान न झाल्याने अनेक भागांतील पिकांना पुरेसा ओलावा मिळालेला नाही.
आता ऑगस्ट महिन्याची परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. तालुक्यात ऑगस्टमध्ये सरासरी 169.8 मि.मी. पाऊस पडतो. मात्र, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत केवळ 24 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिना संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना समाधानकारक पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
पावसाअभावी खरीप पिकांवर संकट
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसह खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांसमोर उत्पादन घटण्याचे संकट उभे ठाकले आहे.
“पावसाची आकडेवारी केवळ कागदावरची संख्या नसून ती शेतकऱ्यांच्या जगण्याशी जोडलेली आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळापूर तालुक्यात
तीव्र कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे नियोजन करावे,” अशी मागणी शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे यांनी केली आहे.
शासनाने तालुक्यातील पावसाची वास्तविक परिस्थिती, पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यांचा तातडीने आढावा घेऊन दुष्काळी उपाययोजना, पीक नुकसान भरपाई व आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.








