घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिक त्रस्त साथीच्या आजारांच्या धास्तीने चिंता वाढली
प्रतिनिधी : चंदन जंजाळ
बाळापूर : पावसाचे प्रमाण कमी असतानाच शहरातील जुने शहर परिसरासह विविध भागांत ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. वाढत्या डासांमुळे साथीचे तसेच हंगामी आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, शहरातील विविध दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत असल्याची चर्चा आहे.
शहरातील काही भागांत नियमित साफसफाई होत नसल्याने कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने दुर्गंधीबरोबरच डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः जुने शहर परिसरातील स्वच्छता व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
वेळीच उपाययोजना केली असती तर परिस्थिती टाळता आली असती?
डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने वेळीच फॉगिंग, कीटकनाशक फवारणी, नाल्यांची स्वच्छता आणि कचरा उचलण्याची प्रभावी व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र, आता तरी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
कचरा हटवून फॉगिंग करण्याची मागणी शहरातील कचऱ्याचे ढीग तातडीने हटवावेत, नाल्या व गटारींची स्वच्छता करावी, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील भागात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्यास संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.








