तीस दिवस पावसाचा खंड, खरीप पिकांनी टाकल्या माना; शेतकऱ्यांची पीक विम्याची मागणी
प्रतिनिधी – संदीप जाधव
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान परिसरात पावसाने सलग सुमारे ३० दिवसाचा खंड दिल्याने बहरलेल्या खरीप पिकांनी आता माना टाकायला सुरवात केली आहे. भरमसाठ खर्च करुनही पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे. मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने सुकत असलेल्या खरीप पिकांचे विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून सुमारे एक महिना उशिराने सुरु झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामही महिनाभराने उशिरा सुरु झालेला आहे. उशिरा सुरु झालेल्या खरीप हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी भरमसाठ खर्च केलेला आहे. त्यामुळे
हंगाम उशिराने सुरु झालेला असला तरी खरीप हंगामी सोयाबीन, बाजरी, कपाशी, मका, तुर, भुईमुग ही पिके चांगली बहरलेली आहेत. मात्र गेल्या सुमारे तीस दिवसांपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. समाधानकारक पाऊस पडला नसल्याने भूगर्भातील पाणी पातळीत कमालीची घट होवून विहीरींनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे उभ्या पिकांना
पाणी देणेही अवघड झालेले आहे. सलग महिनाभर पावसाचा खंड असल्याने तजेलदार उभी पिके आता माना टाकू लागले आहेत.
निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. निसर्गाने दगाफटका दिला तर किमान काही प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळेल.
या अपेक्षेने पंतप्रधान पिक विमा उतरवला जात आहे. पिक विम्याच्या तरतुदी नुसार सलग पावसाचा खड, अतिवृष्टीत सलग पडलेला पाऊस असे निकष देण्यात आलेले आहेत. त्यानुसार खरीप हंगामात सलग २१ दिवस पावसाने खंड दिल्यास पिक विमा नुकसान भरपाई देण्याची तरतुद आहे. त्यानुसार परिसरात सलग सुमारे तीस दिवस पावसाने खंडा दिल्यामुळे खरीपाची पिके माना टाकून करपताना दिसत आहेत. त्यामुळे पिक विमा कंपण्यांनी या करपत असलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून आता होवू लागली आहे.
भरमसाठ खर्च करून बहरलेली पिके करपत असल्याचे शेतकरी उघड्या डोळ्यांनी पहात असल्याने हवालदिल झाला आहे.








