धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा उत्साहात संपन्न
म्हसवडच्या आदिशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी मार्गदर्शन
सोमंथळी, ता. फलटण : धनगर समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा तसेच पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या सामाजिक उद्देशाने आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, म्हसवड महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी राधिका मंगल कार्यालय, सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले (सर) होते. तर मेळाव्याचे उद्घाटन मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर (सर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी पालक व युवक-युवतींना व्याख्याते रविंद्र कोकरे (सर), प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर (सर), संस्थेचे अध्यक्ष राहुल मासाळ साहेब तसेच राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते अरविंद सुळ, युवा नेते बाबासो वाघमोडे, पत्रकार सचिन टेळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भिसे, युवा नेते भानुदास शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते विकास कचरे, सामाजिक कार्यकर्ते अमेय कुंडलकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थितांचे आभार वंचित बहुजन आघाडी, फलटण तालुक्याचे युवा नेते निवृत्ती खताळ (सर) यांनी मानले.
धनगर समाजातील युवक-युवती आणि पालकांना एकत्र आणून विवाहासंदर्भात योग्य संवाद व मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेला हा मेळावा समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.








