कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
प्रतिनिधी : संजय महाजन
भडगांव : दिनांक ३१ ऑगस्ट २०२६, भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावता माळी चौकातील संजय कडू पाटील यांच्या मालकीच्या वैशाली मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी मध्यरात्री मेडिकलमध्ये प्रवेश केला.
ही घटना आज दिनांक ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. चोरट्यांनी मेडिकलमधील चिल्लर ठेवलेल्या वाट्याही चोरून नेल्या व त्या गावातीलच चौकातील एका बोळीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. तसेच मेडिकलमधील सुमारे ५ ते ६ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
भरवस्तीत असलेल्या मेडिकलचे शटर उचकून चोरटे चोरी करण्यात यशस्वी झाल्याने कजगावच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, कजगाव येथील पोलीस मदत केंद्रात पोलिसांची संख्या वाढवून रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कजगावात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा कधी बसणार? रात्रीची पोलीस गस्त वाढणार का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. घटनेबाबत ची माहिती भडगाव पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहेत.








