किनवट शहर अतिक्रमाच्या विळख्यात अपघातांचे प्रमाण वाढले
प्रतिनिधी : सतिश घुले
किनवट : शहरातील मुख्य परिसर आणि प्रमुख चौक सध्या भीषण अतिक्रमाच्या विळख्यात सापडले असून, यामुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बस स्थानक परिसरात व्यापाऱ्यांनी व विक्रेत्यांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमाण केल्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. सामान्य नागरिकांना आपली दुचाकी रस्त्यावरून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
शहराचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या शिवाजी चौकात फळविक्रेते, हातगाड्या आणि इतर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. रस्त्याचा बहुतांश भाग या अतिक्रमाने व्यापल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका अत्यावश्यक सेवांना बसत आहे. एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अग्निशामक दलाचे वाहन किंवा गंभीर रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी असलेली रुग्णवाहिका या भागातून वेळेवर जाणे अशक्य झाले आहे. साधा ऑटो रिक्षादेखील सहजासहजी पास होऊ शकत नाही, अशी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीमुळे एखाद्या वेळी मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने आणि नगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन बस स्थानक परिसर व शिवाजी चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी जोरदार मागणी किनवटकर नागरिकांमधून केली जात आहे.








