शेतकरी मित्र निवडीसाठी महिला आरक्षण सोडतीत १४ सजा महिलांसाठी राखीव
आष्टी -: आष्टी तालुक्यात सन २०२६-२७ साठी मानधनावरील शेतकरी मित्र निवड प्रक्रियेसाठी ३० टक्के महिला आरक्षणाची सोडत शुक्रवारी (ता. २८) तालुका कृषी अधिकारी कार्यालयात पार पडली. तालुक्यातील एकूण ४८ सजा क्षेत्रांपैकी १४ सजा क्षेत्रे महिला उमेदवारांसाठी राखीव करण्यात आली असून उर्वरित ३४ सजा क्षेत्रे खुल्या वर्गासाठी ठेवण्यात आली आहेत.
कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य व प्रकल्प संचालक (आत्मा), बीड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता जाहीर लॉटरी पद्धतीने महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सोडतीनुसार बोरोडी, वाहिरा, खुंटेफळ, कोयाळ, देऊळगाव घाट, मोराळा, देवीनिमगाव, नांदा, शिराळ, निमगाव चोभा, आष्टी, बेलगाव, खडकत व वाळुंज ही १४ सजा क्षेत्रे महिला शेतकरी मित्र उमेदवारांसाठी राखीव करण्यात आली आहेत. या क्षेत्रांमध्ये पुरुष उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उर्वरित ३४ खुल्या सजा क्षेत्रांसाठी महिला व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतील.
या सोडत प्रक्रियेस शेतकरी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या समक्ष जाहीर व पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयातील ग्राम कृषी विकास समितीकडे ता. ५ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी तथा तालुका तंत्रज्ञान चमूचे अध्यक्ष गोरख तरटे यांनी केले आहे.








