एलसीबीची राहुरीत धडक; गुटखा-तंबाखूचा १.७४ लाखांचा साठा जप्त
राहुरी खुर्द व म्हैसगाव येथे दोन ठिकाणी छापे; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
राहुरी प्रतिनिधी : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द आणि म्हैसगाव येथे दोन ठिकाणी छापे टाकून गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण १ लाख ७४ हजार ४४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने राहुरी खुर्द येथील पवन ऊर्फ पृथ्वीराज दगडूसिंग गिरासे याच्या राहत्या घरावर छापा टाकला.
या कारवाईत पथकाने गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा असा १ लाख ४७ हजार ५५२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हैसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मातोश्री सुपर मार्केट येथे छापा टाकला. यावेळी बाबासाहेब भाऊराव गागरे (रा. गागरे मळा, म्हैसगाव) याच्या ताब्यातून हिरा पानमसाला, विमल पानमसाला तसेच विविध प्रकारची सुगंधी तंबाखू असा २६ हजार ४९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा पवन गिरासे याच्याकडून खरेदी केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ पाखरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारवाईत सहभागी पथक
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील पवार, शाहीद शेख, अजिनाथ पाखरे, पोलीस नाईक भीमराज खसे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे व अमृत आढाव यांनी ही कारवाई केली.
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.








