मूर्तिजापुरात ‘रक्षाबंधन ऋणानुबंध सोहळा’ मोठ्या उत्साहात व भावूक वातावरणात पार पडला
प्रतिनिधी : मिलिंद इंगळे जिल्हा
केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकाला बंधुत्वाच्या धाग्याने जोडण्यासाठी आणि सामाजिक सलोखा दृढ करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेविका वैजयंता डोंगरदिवे यांच्या संकल्पनेतून या अनोख्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कै. तुकाराम बिडकर यांच्या स्मृतीस अभिवादन कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात माजी आमदार कै. तुकाराम बिडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. ज्येष्ठ समाजसेविका वैजयंता डोंगरदिवे यांनी श्रद्धेय कै. बिडकर यांच्या प्रतिमेला राखी अर्पण करून शहराच्या विकासातील व सामाजिक कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सामाजिक एकतेचे बांधले ‘वचन’ या सोहळ्यात परिसरातील भगिनींनी केवळ आपापल्या भावांनाच नव्हे, तर समाजात दिवस-रात्र सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना स्नेहाची राखी बांधली. परस्परांचे औक्षण करत भगिनींनी सर्वांच्या सुखाची व दीर्घायुष्याची प्रार्थना केली, तर उपस्थितांनी शहरातील सामाजिक ऐक्य, शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे वचन दिले. या प्रसंगी संपूर्ण परिसर भावनिक आणि कौटुंबिक वातावरणाने व्यापून गेला होता.
आमदार हरीश पिंपळे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार हरीश पिंपळे यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. आपल्या मनोगतात ते म्हणाले, “रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून तो समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा व एकात्मता निर्माण करणारा भक्कम पूल आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव आणि विश्वासाचे वातावरण अधिक घट्ट होते.”
मान्यवरांची मोठी उपस्थिती याप्रसंगी नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्यासह परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवर, स्थानिक पत्रकार, महिला मंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लकडगंज परिसरातील महिला व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. या आगळ्यावेगळ्या आणि उपक्रमशील सोहळ्यामुळे मूर्तिजापूर शहरात सामाजिक सलोखा, ऐक्य आणि बंधुत्वाचा एक नवा सकारात्मक संदेश गेला आहे.








