आ. संग्राम जगताप, आ. नितीन पवार यांनी घेतले श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन
आ. सुरेश धस यांनी केले स्वागत; भव्यदिव्य मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी
आष्टी (प्रतिनिधी) श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड देवस्थान, सावरगाव (मायंबा) येथे शनिवारी अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैय्या जगताप आणि माजी आमदार नितीनराव पवार यांनी भेट देत श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड देवस्थानचे विश्वस्त तथा आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी आ. संग्राम जगताप व माजी आ. नितीन पवार यांचे देवस्थानमध्ये स्वागत केले. मान्यवरांनी श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
यानंतर अहिल्यानगरचे आ. संग्राम जगताप व नाशिकचे माजी आ. नितीन पवार यांनी देवस्थान परिसरात सुरू असलेल्या भव्यदिव्य मंदिर जीर्णोद्धार व उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. मंदिराचे भव्य स्वरूप, सुरू असलेली विविध विकासकामे, भाविकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा तसेच परिसराच्या सुशोभीकरणाची त्यांनी माहिती घेतली.
मंदिराची उभारणी अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध पद्धतीने आकार घेत असल्याचे पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळात श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड देवस्थान हे अधिक भव्य, आकर्षक आणि भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विश्वस्त आ. सुरेश धस यांनी देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची तसेच भव्य मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाची सविस्तर माहिती आ. संग्राम जगताप व आ. नितीन पवार यांना दिली. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी माहिती दिली.
याप्रसंगी नानासाहेब पवार, बजरंग भाऊ घोडके, रविराज पुरी, प्रमोद चितळे, भाऊसाहेब पालवे, विनोद चन्ने यांच्यासह अन्य मान्यवर तसेच मोठ्या संख्येने भक्त-भाविक उपस्थित होते.








