गांधी महाविद्यालयाचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचले हि बाब कौतुकास्पद : प्राचार्य भंडारी
आष्टी ( वार्ताहर ):- कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित गांधी महाविद्यालयात हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक प. पू. श्री अमोलक ऋषीजी म. सा. व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त उपाध्यक्ष बाबूलाल भंडारी, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा ,संस्थेचे समन्वयक प्रा. नवनाथ पडोळे उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी, मुख्याध्यापक मथाजी शिकारे, मुख्याध्यापक थोरात, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. जमीर सय्यद, श्री परजणे,डॉ प्रशांत मेहेर व इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ जमीर सय्यद यांनी खेळाचे मानवी जीवनातील महत्त्व व निरोगी राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ महेंद्र पटवा यांनी खेळामुळे अचूक निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी कशाप्रकारे मदत होते हे विशद केले. प्राचार्य डॉ. जवाहरलाल भंडारी यांनी खेलेगा तो खिलेगा इंडियाच्या माध्यमातून खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे प्रोत्साहन यावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना श्री बाबुलाल भंडारी यांनी भव्य क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचे व खेळाडू विद्यार्थ्यांना सवलती देण्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय व विविध क्रीडा महोत्सवातील सहभागी यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट देऊन गौरविण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू कु. श्रावणी दळवी तसेच बास्केटबॉल विद्यापीठ संघात विशेष प्राविण्य नोंदविलेल्या कु. निकिता पोकळे, कु. प्रतीक्षा शिंदे, कु. प्रतीक्षा फल्ले, कु. अनुष्का सूर्यवंशी, कु. अनुष्का ढोबळे, कु. जान्हवी उदावंत, कु. भारती फल्ले, साहिल सय्यद, अजमत खान, गोकुळ नायर, चेतन खंदारे, कु. आराध्या खंडागळे, तोशीत तोमर, या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, मेडल व ट्रॅक सूट देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमधून कु. श्रावणी दळवी व प्रतीक्षा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिल गर्जे व आभार प्रदर्शन डॉ नवनाथ विधाते यांनी केले.








