नियमित आठ तास वीजपुरवठ्यासाठी सावरगाव सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी : उज्वल जैस्वाल
मोताळा : पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात असताना सिंचनासाठी नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने परिसरातील शेकडो शेतकरी आक्रमक झाले. सावरगाव येथील महावितरणच्या सबस्टेशनवर शेतकऱ्यांनी तब्बल चार तास ठिय्या आंदोलन करीत दररोज किमान आठ तास सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी केली. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून नियमित आठ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.
तालुक्यात मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मका, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके संकटात सापडली आहेत. त्यातच विहिरींमध्ये पुरेसे पाणी असतानाही महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सावरगाव सबस्टेशनवर शेतकऱ्यांनी आंदोलन करीत महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून वीजपुरवठ्याबाबत जाब विचारला.
आंदोलनादरम्यान कार्यालयाची तोडफोड झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, परिस्थितीची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार निर्मळ यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांना शांत करून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत नियमित आठ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या दररोज किमान आठ तास वीजपुरवठा करावा, देखभाल-दुरुस्तीची कामे वीजपुरवठा बंद असताना करावीत, वीजपुरवठ्याच्या वेळेत खंड पडल्यास तेवढा वेळ वाढवून द्यावा, वीजसेवकांची संख्या वाढवावी, कार्यालयीन वेळेत कार्यालये सुरू ठेवावीत आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या आंदोलनात किसान काँग्रेसचे अध्यक्ष नितीन राजपूत, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी शुभम घोंगटे पाटील, माजी सभापती अवी पाटील आदी सहभागी झाले होते.








