चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या, आरोपीस अटक
प्रतिनिधी : उज्वल जैस्वाल
खामगाव,चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने पत्नीवर बेसबॉलच्या बॅटने डोक्यावर, हातावर आणि पायांवर मारहाण करून तिची हत्या केल्याची घटना शहरातील गोपाळनगर घरकुल परिसरात रविवार, ३० ऑगस्ट रोजी रात्री घडली. या घटनेत लक्ष्मी गणेश डाबेराव (२६) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी पती गणेश महादेव डाबेराव (२६) याला अटक केली आहे.
गोपाळनगर घरकुल परिसरात गणेश डाबेराव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी राहत होते. ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरातून जोरात आरडाओरड ऐकू आल्याने शेजारील रोहन देवीदास घोडाम यांनी घराकडे धाव घेतली असता गणेश हा पत्नी लक्ष्मी हिला बेसबॉलच्या बॅटने मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. त्यानंतर गणेशने लक्ष्मी यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायांवर बॅटने मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मंदार पुरी यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी फिर्यादी रोहन देवीदास घोडाम (२६, व्यवसाय मजुरी, रा. गोपाळनगर घरकुल, खामगाव) यांच्या तोंडी तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गणेश डाबेराव याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, चारित्र्याच्या संशयातून झालेल्या या हत्येमुळे गोपाळनगर घरकुल परिसरात खळबळ उडाली असून, हत्येमागील कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास शिवाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक सरकटे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.








