शेतकऱ्यांच्या भविष्यांशी खेळणाऱ्यांवर लगाम घालत; खाजगी हवामान अंदाजांवर शासनाने बंदी घालावी
अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान; शासकीय यंत्रणा सक्षम करण्याची माजी आ. भीमराव धोंडे यांची मागणी
आष्टी – चुकीचे हवामान अंदाज सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या खाजगी व्यक्तींवर शासनाने बंदी आणावी, अशी मागणी माजी आ. भीमराव धोंडे यांनी केली. अंदाजाच्या आधारावर शेतकरी खते व बियाणे खरेदी करून पेरणी करतात ; मात्र पाऊस न पडल्यास त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे हवामान अंदाज जाहीर करण्यासाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणाच असावी,असे त्यांनी स्पष्ट केले.

कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील प्रा. डॉ. दत्तात्रय बोडखे आणि प्रा. डॉ. सुमन खेडकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून माजी आ. भीमराव धोंडे बोलत होते. पुढे बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले, गेल्या काही वर्षांत विविध माध्यमांतून हवामान अंदाज सांगणाऱ्या खाजगी व्यक्तींची संख्या वाढली आहे. अनेक जण कोणत्याही अधिकृत हवामानविषयक ज्ञानाशिवाय अंदाज व्यक्त करतात. या अंदाजांवर विश्वास ठेवून शेतकरी शेतीचे नियोजन करतात. खते, बियाणे व इतर कृषी निविष्ठांवर खर्च करून पेरणी केली जाते; मात्र अंदाज चुकल्यास आणि अपेक्षित पाऊस न झाल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडतो.
शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या चुकीच्या आणि बेजबाबदार हवामान अंदाजांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. शासनाने अशा व्यक्तींवर बंदी आणून शासकीय पातळीवरील हवामान यंत्रणा अधिक सक्षम करावी. तज्ज्ञांच्या वैज्ञानिक अभ्यासावर आधारित आणि अधिकृत हवामान अंदाजच जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन नियमित व्यायाम आणि सकस आहाराला प्राधान्य द्यावे, असेही धोंडे यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन राजेश धोंडे, बाबुलाल भंडारी, राजाबापू नलावडे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य डॉ. संभू वाघुले, प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे, प्राचार्य डॉ. बापुराव धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, महेश कारखान्याचे संचालक बजरंग कर्डीले, प्राचार्य डॉ. भगवान वाघुले, हभप निवृत्ती महाराज बोडखे, सरपंच भीमराव बोडखे, आंधळे महाराज, रविंद्र चौधरी, गणेश वाघमारे, चित्रसेन भवार, डॉ. शाम सांगळे, प्रा. डॉ. भाऊसाहेब काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात भीमराव धोंडे यांच्या हस्ते प्रा. डॉ. दत्तात्रय बोडखे व प्रा. डॉ. सुमन खेडकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या २६ व्या ‘शेतकरीयन’ अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी प्रास्ताविक केले.
चुकीच्या अंदाजाने आर्थिक फटका खाजगी हवामान अंदाजांवर विश्वास ठेवून शेतकरी खते व बियाणे खरेदी करून पेरणीचे नियोजन करतात. मात्र, अंदाजानुसार पाऊस न पडल्यास पेरणी वाया जाऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो, असे भीमराव धोंडे यांनी सांगितले.
तज्ज्ञांकडूनच हवामान अंदाज द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामान अंदाज देणारी शासकीय यंत्रणा अधिक सक्षम करावी. वैज्ञानिक माहिती आणि तज्ज्ञांच्या अभ्यासावर आधारित अधिकृत हवामान अंदाजच जाहीर करावेत, अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली. यावेळी प्रा. डॉ. दत्तात्रय बोडखे,प्रा. डॉ. सुमन खेडकर व इतरांची भाषणे झाली.
महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास शिक्षक तसेच बोडखे व खेडकर यांचे नातेवाईक व स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपप्राचार्य डॉ बापु खैरे, प्रा. डॉ. गोपीनाथ बोडखे, प्रा. डॉ. शैलजा कुचेकर यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. राम बोडखे यांनी मानले.








