विनयभंगाच्या आरोपप्रकरणी कड्यात बंद; कारवाईची मागणी
नागरिकांकडून निषेध; आरोपीला संस्थेच्या मानद मंत्रीपदावरून हटविले
आष्टी – उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या विनयभंगाचा डॉक्टरवर आरोप झाल्यानंतर कड्यात संवेदनशील वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच एका शिक्षण संस्थेचा पदाधिकारी असलेल्या डॉ. महेंद्र पटवा यांच्याबाबत संस्थेने योग्य निर्णय घ्यावा, या मागणीसाठी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या निषेधाला डॉक्टर, मेडिकल, शाळा, महाविद्यालये आणि व्यापारी असोसिएशनसह नागरिकांनी प्रतिसाद दिला.
या प्रकरणी डॉ. पटवा यांच्याविरोधात सोमवारी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून निषेधात सहभाग नोंदविला. उपचाराच्या ठिकाणी तरी सुरक्षितता, विश्वास आणि संवेदनशीलता जपली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या घटनेच्या निषेधार्थ शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. नागरिकांनी एकत्र येत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, संबंधित आरोपी डॉक्टरला संस्थेच्या मानद मंत्रीपदावरून हटविण्यात आल्याचे अध्यक्षस्थानी पत्रक काढले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे दिल्याचे समजते.








