पंचायत राजच्या दौराने कर्मचारी-अधिकाऱ्यांची बत्ती गुल!
कामचुकार अधिकारी आणि बोगस कामांवर कारवाईची अपेक्षा
प्रतिनिधी : चंदन जंजाळ
बाळापूर, सन २०२० ते २०२६ दरम्यानच्या विकासकामांची आणि आराखड्यांची पाहणी करण्यासाठी विधिमंडळातील जिल्ह्यातील एकूण २७ सदस्यांची पंचायत राज समिती २ सप्टेंबर रोजी दाखल झाली आहे. ही समिती प्रत्येक पंचायत समितीला भेट देऊन गावोगावी शाळा, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत, विद्युत मंडळ तसेच महसूल विभागाला भेट देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बाळापूर तालुक्यातील ग्रामपंचायत, शाळा आणि विविध विभागांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे पंचायत राज समितीच्या सदस्यांकडून सर्व प्रश्न मार्गी लागतील का, असा खोचक सवाल जनता उपस्थित करीत आहे.
तालुक्यात पंचायत राज समिती येणार असल्याची माहिती सर्व कार्यालयांना मिळताच अधिकारी-कर्मचारी आपली कार्यालये स्वच्छ आणि सुंदर कशी दिसतील, याची काळजी घेत आहेत. मात्र काही कार्यालयांमध्ये बोगस कामे केली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. अशा गंभीर प्रकारांकडे पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे आणि सर्व सदस्य लक्ष देतील, तसेच पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल खाते व इतर सर्व कार्यालयांमध्ये पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








