भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यांमध्ये भीती; जलपर्णीमुळे डासांचा धोका!
बाळापुर ताप्र शहारात विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्यासमोर दुहेरी आव्हान; नदी-नाल्यांतील घाण, दुर्गंधी व कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त
प्रतिनिधी : चंदन जंजाळ
बाळापूर : शहरातील वाढती भटक्या कुत्र्यांची संख्या आणि दुसरीकडे नदी-नाल्यांमध्ये साचलेली घाण व जलपर्णी यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. विशेषतः सकाळच्या वेळी शाळेत जाणाऱ्या लहान मुला-मुलींच्या मार्गावर कुत्र्यांचे कळप दिसून येत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर भैंस नदी-बाला देवी परिसरात पसरलेली जलपर्णी, साचलेला कचरा आणि सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होत असल्याची नागरिकांची चिंता आहे.
शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सकाळच्या वेळी प्राथमिक शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसह विद्यार्थिनींना विविध मार्गाने जावे लागते. या मार्गांवर भटक्या कुत्र्यांचे कळप दिसत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अचानक कुत्र्यांनी मुलांचा पाठलाग करणे किंवा आक्रमक होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
दोन वर्षांत संख्या वाढल्याची नागरिकांची भावना स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मागील सुमारे दोन वर्षांत शहरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी बाहेरील भागातून कुत्रे शहरात आणून सोडले जात असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे. नगर परिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून लागू नियमांनुसार सुरक्षित व मानवी पद्धतीने नियंत्रणात्मक उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
जलकुंभीने नदीपात्रात मांडला ठिय्या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबरोबरच शहरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर होत आहे. भैंस नदी-बाला देवी परिसरात जलपर्णी पाण्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कचरा व सांडपाणी साचल्यामुळे नदी परिसरातील वातावरणावर परिणाम होत आहे.
संध्याकाळनंतर दुर्गंधी; डासांच्या उत्पत्तीचा धोका नदीतील कचरा, सांडपाणी आणि जलपर्णीमुळे संध्याकाळनंतर दुर्गंधीची समस्या वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. साचलेले पाणी आणि जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीस पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रात्री १० नंतर बाजार परिसरात वाढते अस्वच्छता रात्री सुमारे १० वाजल्यानंतर बाजारपेठ बंद झाल्यानंतर अनेक गल्लीबोळांमध्ये भटक्या कुत्र्यांची वर्दळ वाढते. कचरा विखुरल्यामुळे रस्ते आणि नाल्यांची स्वच्छता प्रभावित होते. काही ठिकाणी हॉटेल व दुकानांमधून निघणारे सांडपाणी साचत असल्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
केवळ स्वच्छता नव्हे, नियमित देखरेखीची गरज नगर परिषद प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची नियमित साफसफाई करावी, नदी परिसरातील जलपर्णी हटवावी तसेच आवश्यकतेनुसार फॉगिंग व कीटकनाशक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर लागू नियमांनुसार सुरक्षित आणि मानवी पद्धतीने नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
इशारा : समस्या गंभीर होण्याची वाट पाहू नका! लहान मुलांची सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न केवळ तक्रारींपुरते मर्यादित राहणे योग्य ठरणार नाही. भटक्या कुत्र्यांचे कळप, जलपर्णी, सांडपाणी आणि डासांचा वाढता धोका याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने संवेदनशील ठिकाणांचे सर्वेक्षण करून नियमित देखरेख व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याची गरज आहे.








