सोनगिरीतील आरओ प्रकरणाची ११ सप्टेंबरला चौकशी!
[उपोषणाचा इशारा देणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाचे आवाहन; चौकशीदरम्यान खरेदी व खर्चाची तपासणी होणार]
प्रतिनिधी : चंदन जंजाळ
बाळापूर : सोनगिरी येथील गट ग्रामपंचायत जोगलखेड अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या आरओ फिल्टरबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रशासनाने दखल घेतली आहे. आरओ फिल्टर खरेदी करून चार ते पाच वर्षे उलटूनही तो सुरू करण्यात आलेला नसल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध झाली नसल्याची तक्रार श्री. नितेश गवई, मंगेश खेळकर, संदीप साठे व इतर ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे केली आहे.
तक्रारीमध्ये सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरओ फिल्टरच्या खरेदीसह निधीच्या वापराबाबत जबाबदारी निश्चित करावी तसेच दोष आढळल्यास संबंधित सरपंच व सचिवांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी अर्ज सादर केला होता. त्यानंतर प्रशासनाकडून २५ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी संबंधित पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
११ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष चौकशी; पंचायत समिती बाळापूरच्या वतीने विस्तार अधिकारी (पंचायत) हे ११ सप्टेंबर २०२६ रोजी गट ग्रामपंचायत जोगलखेड येथे प्रत्यक्ष चौकशीसाठी जाणार आहेत. या चौकशीदरम्यान आरओ फिल्टरची खरेदी, त्यासाठी झालेला खर्च, उपलब्ध निधीचा वापर तसेच प्रत्यक्ष स्थिती याबाबत आवश्यक तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, चौकशीची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामस्थांनी प्रस्तावित उपोषणापासून परावृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती बाळापूर यांनी केले आहे. चौकशीत वस्तुस्थिती समोर येऊन संबंधित बाबींवर नियमानुसार निर्णय होण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.








