गोकुंद्यात २३ वर्षीय होमगार्डचा दुर्दैवी अंत
” पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या गणेश चौफडेच्या मृत्यूने हळहळ आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू”
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे खोली करून राहत असलेल्या २३ वर्षीय होमगार्ड जवान गणेश चौफडे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करून पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गणेशच्या अकाली निधनाने गोकुंदा परिसरात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश चौफडे सावरगाव तांडा येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होता. कर्तव्य बजावत असतानाच पोलीस दलात भरती होण्यासाठी तो मेहनत घेत होता. त्याच्या मनात पोलीस सेवेत जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी तो नियमितपणे तयारी करीत असल्याची माहिती समोर येत आहे. अल्पवयातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेशचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणत्याही प्रकारची अधिकृत कारणमीमांसा सध्या समोर आलेली नसून, पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. गणेशच्या मृत्यूमागे कौटुंबिक, वैयक्तिक किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास करण्यात येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ३ सप्टेंबरच्या सकाळी गणेशच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली तरुण वयात होमगार्ड म्हणून सेवा बजावत असलेल्या आणि पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गणेशचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्याच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत असून, तपासातील निष्कर्षानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.








