किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची उचलबांगडी नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली
प्रतिनिधी – मार्कंडेय सिरामवार
किनवट : अत्यावश्यक आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणे, आर्थिक फायद्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून नागरिकांना नाहक त्रास देणे, तसेच अवैध धंद्यांना खतपाणी घालणे यांसारख्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेले किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची अखेर तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कराड यांची नांदेड नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर नियंत्रण कक्षातील जगदीश मंडलवार यांची नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गणेश कराड यांच्या कार्यकाळात किनवट शहरासह तालुकाभरात अवैध धंद्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले होते. मटका, जुगार, अवैध गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून सातत्याने होत होता. आर्थिक लागेबांध्यांमुळे अवैध व्यवसायांना छुपं संरक्षण मिळत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.
मात्र, अलीकडच्या काही घटनांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली होती एका आदिवासी पीडित महिलेची अत्याचार प्रकरणी फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणे आणि उलट फिर्यादी महिलेलाच धमकावणे.चिखली येथील एका गंभीर प्रकरणातील आरोपीचे हातकडीसह पोलीस ताब्यातून पलायन होणे.
किनवट हद्दीत कारवाईसाठी आलेल्या तेलंगणा पोलिसांवर झालेला हल्ला आणि कायदा-सुव्यवस्थेचा ढासळलेला बोजवारा.
या लागोपाठ घडलेल्या गंभीर घटनांमुळे वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेत निरीक्षक गणेश कराड यांची तत्काळ नियंत्रण कक्ष, नांदेड येथे रवानगी केली.
या कारवाईमुळे किनवट शहरातील शांतताप्रिय नागरिक आणि सामाजिक वर्तुळातून समाधान व्यक्त केले जात आहे. आता नवनियुक्त पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार हे शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर वचक बसवून कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यात यशस्वी ठरतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








