पाऊस दगा देतोय पिकं करपली कालवा असूनही पूर्व भाग तहानलेलाच
मका-बाजरी-कपाशी सोयाबीन आदी पिके संकटात उत्पादन खर्चही वसूल होण्याची आशा मावळली — डोंगरगाव कालव्याच्या पाण्याच्या नियोजनावर शेतकऱ्यांचा संताप
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील शेतकऱ्यांवर यंदा पुन्हा दुष्काळाचे सावट गडद झाले आहे पावसाची ओढ जमिनीत ओलावा नाही आणि उभ्या पिकांची अवस्था बिकट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मका बाजरी सोयाबीन कांदा रोपे कपाशी,सोयाबीन यांसह विविध खरीप पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला असून अनेक शेतांमध्ये पिके अक्षरशः करपून जाण्याच्या मार्गावर आहेत
पेरणीपासून खत बियाणे औषधे मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करूनही हातात उत्पादन येण्यापूर्वीच पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे एकीकडे पिकांचे नुकसान दुसरीकडे वाढता कर्जाचा बोजा आणि तिसरीकडे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे
कालवा असूनही बांध कोरडे
उत्तरपूर्व भागासाठी आशेचा किरण ठरलेल्या डोंगरगाव कालव्याचे पाणी पूर्व भागातील बंधाऱ्यांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचले असते तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता अशी भावना आता व्यक्त होत आहे मात्र पाणी उपलब्ध असतानाही पूर्व भागातील अनेक बंधारे पाण्यापासून वंचित राहिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे
कालवा अनेक दिवस वाहिला पण पूर्व भागातील शेतकऱ्याच्या बांधावर पाणी नाही मग पाण्याचे नियोजन नेमके कुठे चुकले असा सवाल उपस्थित होत आहे
एक पाऊस आणि संपूर्ण हंगामाचे गणित बिघडले या भागातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे वेळेवर पाऊस न झाल्यास पेरणी रखडते आणि पेरणीनंतर पाऊस खंडित झाल्यास पिकांची वाढ खुंटते यंदाही अनेक ठिकाणी मका कणसात येण्याआधीच करपला बाजरीची सोयाबीन वाढ खुंटली करपली कपाशीची वाढ थांबली तर काही शेतांमध्ये दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे
शेतकऱ्यांसमोर आता केवळ पिकांचा प्रश्न राहिलेला नाही जनावरांसाठी चारा कुठून आणायचा पिण्याचे पाणी कुठून मिळवायचे आणि पुढील हंगामासाठी पैसा कुठून उभा करायचा या प्रश्नांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे
शेतमजुरांचाही रोजगार हिरावला शेतीच अडचणीत आल्याने त्याचा थेट परिणाम शेतमजुरांवर झाला आहे शेतात कामे नसल्याने मजुरांच्या हाताला रोजगार मिळत नाही परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडून स्थलांतर करण्याची वेळ अनेक मजुरांवर येत आहे
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन उत्तरपूर्व येवला भाग दुष्काळग्रस्त घोषित करावा पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी रोजगार हमीची कामे सुरू करावीत तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे
त्याचबरोबर डोंगरगाव कालव्याचे पाणी पूर्व भागातील शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल असे ठोस नियोजन करावे अशीही जोरदार मागणी आहे
पिके वाचवण्याची वेळ निघून चालली आहे आता आश्वासन नव्हे पाण्याचे नियोजन आणि प्रत्यक्ष मदत हवी
प्रतिक्रिया,,,,
ही केवळ पिकांची नाही तर पूर्व भागाच्या अस्तित्वाची लढाई आहे
पाऊस दगा देतोय पिकं करपलीत उत्पादन खर्चही निघण्याची आशा मावळलीय आणि डोंगरगाव कालवा वाहूनही पूर्व भागातील बंधारे कोरडेच राहिले ही परिस्थिती वेदनादायक आहे मग पूर्व भागावर अन्याय का
आता आश्वासनांची वेळ संपली दुष्काळ जाहीर करा पिकांचे पंचनामे करा आणि कालव्याचे पाणी शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचवा पूर्व भाग शांत आहे पण शेतकऱ्यांचा संयम संपत चाललाय आता पाण्याचा हिशोब आणि नियोजन दोन्ही द्यावेच लागेल
…..योगेश दारुंटे पूर्व भाग पाणी आंदोलक








