पिंपळखुटे तीसरे शाळेचा ‘सुपरनिपुण’ प्रवास; प्रयोगशीलतेतून गुणवत्तेची नवी वाट
उपक्रमशील शिक्षक प्रविण विंचू यांच्या पुढाकाराने तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभागातून शाळेचा जिल्ह्यात नावलौकिक
प्रतिनिधी : लक्ष्मण घुगे
राजापूर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात आधुनिक तंत्रज्ञान, डोळ्यांसमोर गुणवत्तेचे स्वप्न आणि शिकण्याला आनंदाची जोड मिळाली की शाळेचे रूप पालटते. इच्छाशक्तीला कृतीची जोड देत गुणवत्ता, सुंदरता, स्वच्छता, उपक्रमशीलता आणि सामाजिक सहभाग या पंचसूत्रीच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळखुटे तीसरे ने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील पहिली लोकसहभागातून साकारलेली इंटरॲक्टिव्ह शाळा ते ‘सुपरनिपुण’ शाळेचा प्रवास, असा या शाळेचा प्रेरणादायी आलेख आहे.
लोकसहभागातून शाळेत इंटरॲक्टिव्ह सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेला तंत्रज्ञानाची प्रभावी जोड मिळाली. त्यातून विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता विविध स्पर्धा, उपक्रम आणि नाविन्यपूर्ण पद्धतींच्या माध्यमातून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्यात आले. शिक्षकांच्या या प्रयत्नांची दखल घेत ग्रामपंचायतीने शाळेला कंपाउंड, संगणक, प्रिंटर, शालेय पोषण आहारासाठी उपयुक्त साहित्य तसेच चाईल्ड थिएटरयुक्त रंगकाम यांसह विविध स्वरूपाची भरीव मदत केली.
विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला अधिक परिणामकारक बनविण्यासाठी मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर आधारित पाच हजारांहून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्नांचा स्वनिर्मित प्रश्नसंच तयार करण्यात आला आहे. या प्रश्नसंचाचा वापर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत केला जातो. स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, वास्तुनिष्ठ प्रश्नसंच आणि इंटरॲक्टिव्ह बोर्डच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागाला चालना मिळत आहे.
●स्पोकन इंग्लिशमध्ये जिल्ह्यातील अव्वल चार शाळांमध्ये निवड
जिल्हा परिषद नाशिक आणि विनोबा यांच्या संयुक्त उपक्रमातून पहिल्या वर्षी राबविण्यात आलेल्या स्पोकन इंग्लिश स्पर्धेत जिल्ह्यातील पहिल्या चार शाळांमध्ये पिंपळखुटे ३रे शाळेची निवड झाली. याबद्दल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते शाळेचा गौरव करण्यात आला, तर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. याच उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विश्वास ९०.८ एफएम रेडिओवर मुलाखत देण्याची संधी मिळाली. या मुलाखतीचा अनुभव ‘विनोबा म्हणे’ या पुस्तकातही प्रकाशित झाला.
●स्पेलिंग बी, मॅथ बीमध्येही ठसा
शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पेलिंग बी आणि मॅथ बी या स्पर्धांसाठी सातत्याने तयारी केली असून तालुकास्तरासह जिल्हास्तरावरही शाळेने आपली छाप उमटवली आहे. इंग्रजी वाचन सहज आणि कमी वेळेत करता यावे, यासाठी ‘लीफ फॉर वर्ड’ इंग्रजी साक्षरता कार्यक्रम वर्गात प्रभावीपणे राबविला जात आहे. विविध कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याने इंग्रजी विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व आवड निर्माण होत आहे.
शाळेच्या गुणवत्तावाढीच्या उपक्रमांची दखल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांच्या भेटीदरम्यान घेण्यात आली. राज्यस्तरीय शैक्षणिक साधनस्रोत व्यक्तींनीही शिक्षक प्रविण विंचू यांच्या कामाचे कौतुक केले असून त्यांच्या ब्लॉगवर या कार्याची इंग्रजी भाषेत लेखरूपाने नोंद करण्यात आली आहे.
या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक व आनंददायी अध्ययन वातावरण निर्माण व्हावे, हा शिक्षक प्रविण विंचू यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. उपक्रमशील शिक्षक प्रविण विंचू यांना मुख्याध्यापक दत्तात्रय कमोदकर यांची मोलाची साथ लाभत असून शिक्षक, पालक, ग्रामपंचायत आणि लोकसहभागाच्या बळावर पिंपळखुटे ३रे शाळेचा ‘सुपरनिपुण’ प्रवास अधिक प्रेरणादायी ठरत आहे.
> उल्लेखनीय उपक्रम…
*नाविन्यपूर्ण परिपाठ
*सेल्फी विथ सक्सेस
*स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य वापर
*स्वनिर्मित वास्तुनिष्ठ प्रश्नसंच
*इंटरॲक्टिव्ह बोर्ड वापर
*मॅथ बी स्पर्धा तयारी
*स्पेलिंग बी स्पर्धा तयारी
*वाचन उपक्रम
*इंग्रजी संभाषण
*आनंददायी शनिवार
*क्षेत्रभेट
*नाविन्यपूर्ण घटकावर पालकांच्या मदतीने तयारी
*चाईल्ड थिएटरयुक्त वर्गखोली
*लीफ फॉर वर्ड इंग्रजी साक्षरता कार्यक्रम
*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक व आनंददायी अनुभवातून अध्ययनपुरक वातावरण निर्माण करून आनंद देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.*
*प्रविण विंचू*
उपक्रमशील शिक्षक. पिंपळखुटे 3रे








