*रिपाईचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांना राज्यमंत्रीपद द्या*
*रिपाई जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांची मागणी; हजारो भीमसैनिकांसह रामदास आठवले यांची भेट घेणार*
प्रतिनिधी : सचिन सरतापे
म्हसवड : आंबेडकरी चळवळीत गेली चार दशके सातारा जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत राहून दीनदलित, शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव (बापू) गायकवाड यांना आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपद अथवा महामंडळाचे पद देऊन योग्य सन्मान करावा, अशी जोरदार मागणी रिपाईचे जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत अशोकराव गायकवाड यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल ४० वर्षे सामाजिक व राजकीय संघर्षासाठी दिली आहेत. अन्यायग्रस्त आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने, महामोर्चे तसेच प्रसंगी न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली असल्याचा दावा रोकडे यांनी केला.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी दीर्घकाळ निष्ठेने कार्यरत राहून सातारा जिल्ह्यात रिपब्लिकन चळवळीला संघटनात्मक ताकद देण्याचे काम गायकवाड यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय योगदानाची दखल घेऊन त्यांना सत्तेतील योग्य स्थान मिळणे आवश्यक असल्याचे रोकडे यांनी म्हटले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील भूमिकेचा उल्लेख २०१४ मध्ये रिपाईच्या आदेशानुसार सातारा लोकसभा मतदारसंघातून बलाढ्य उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवत रिपब्लिकन पक्षाची भूमिका जनतेसमोर ठामपणे मांडली. या निवडणुकीत रिपाईला मोठ्या प्रमाणावर मते मिळवून देत आंबेडकरी चळवळीचे राजकीय अस्तित्व अधोरेखित करण्याचे काम गायकवाड यांनी केले, असा दावा रोकडे यांनी केला.
सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांमध्ये अशोकराव बापू गायकवाड यांना राज्यमंत्रीपद किंवा महत्त्वाचे महामंडळाचे पद मिळावे, अशी भावना असल्याचेही रोकडे यांनी सांगितले.
“बापूंच्या संघर्षाचा आणि सामाजिक योगदानाचा योग्य सन्मान होणे ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आगामी काळात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना रिपाईला मिळणाऱ्या संधीमध्ये सातारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे आणि अशोकराव गायकवाड यांना राज्यमंत्रीपद द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीसाठी हजारो भीमसैनिक व रिपाई कार्यकर्ते लवकरच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार असल्याची माहिती रिपाई जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे आणि सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी दिली.








