*OJT उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जाणून घेतले नगरपरिषदेच्या कारभाराचे धडे*
*म्हसवड नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती; प्रशासकीय कार्यपद्धतीचा घेतला प्रत्यक्ष अनुभव*
प्रतिनिधी : सचिन सरतापे
म्हसवड : श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने OJT (On Job Training) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी म्हसवड नगरपरिषदेच्या प्रशासकीय व विकासात्मक कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी म्हसवड नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी, सभापती अखिल काजी तसेच आरोग्य विभाग प्रमुख श्री. सागर सरतापे यांच्या मुलाखती घेतल्या.
या मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेची प्रशासकीय रचना, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती, शहरातील नागरी सुविधा, आरोग्य व्यवस्था, स्वच्छता, नागरिकांच्या समस्या आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी विविध विकासकामे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
राज्यशास्त्र विषयातील विविध संकल्पना केवळ पुस्तकातून न शिकता त्यांचा प्रत्यक्ष प्रशासनाशी संबंध समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली. विद्यार्थ्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विविध प्रश्न विचारले तसेच नगरपरिषदेच्या कामकाजाचे निरीक्षण केले.
या उपक्रमासाठी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. जी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. एस. डी. माने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नगरपरिषद प्रशासनाविषयी विविध प्रश्न उपस्थित केले.
OJT उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय कार्यपद्धतीचे ज्ञान, संवादकौशल्य, निरीक्षणक्षमता, प्रश्न विचारण्याची क्षमता तसेच व्यावहारिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होत आहे, असे मार्गदर्शकांनी यावेळी सांगितले.
महाविद्यालयीन शिक्षण आणि प्रत्यक्ष प्रशासकीय अनुभव यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.








