*डी.जे.मुक्त, पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करा*
*म्हसवड पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या बैठकीत सहायक निरीक्षक संदीप पोमण यांच्या सूचना*
*डी.जे. व दारूला थारा दिल्यास गुन्हे दाखल; आदर्श मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’*
प्रतिनिधी : सचिन सरतापे
म्हसवड : गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोपा वाढविणारा उत्सव असून तो पारंपरिक, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तसेच डी.जे.मुक्त पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन रणजित सावंत यांनी केले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव शांततेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश मंडळांनी सादर केलेल्या देखाव्यांमधून कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत अथवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर उत्सवाच्या काळात केवळ मनोरंजनावर भर न देता रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, अन्नदान, आश्रमशाळांना मदत यांसारखे सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन पोमण यांनी केले.
महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन
गणेश मंडळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचनाही पोलिसांकडून देण्यात आल्या. उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.
डी.जे. लावणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा गणेशोत्सवात डी.जे. लावण्यास परवानगी नसून नियमांचे उल्लंघन करून डी.जे. लावणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला. तसेच दारू पिऊन गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
आदर्श गणेश मंडळांना ‘गणराया अवॉर्ड’ म्हसवड पोलीस ठाण्याच्या बिटअंतर्गत येणाऱ्या गावांमधील गणेश मंडळांनी शांततापूर्ण, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांची निवड करून त्यांना ‘गणराया अवॉर्ड’ देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय टाकणे, पत्रकार जावेदभाई मुलाणी, पत्रकार महेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत विविध सूचना मांडल्या.
बैठकीस माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, सचिन वीरकर, निशांत पिसे, पत्रकार, पोलीस पाटील, विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, डी.जे. मालक तसेच संबंधित नागरिक उपस्थित होते.
“गणेशोत्सव हा भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव ठरावा. कायद्याचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करत उत्सव साजरा करावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
*“सोलापूर जिल्ह्यात डी.जे.मुक्त गणेशोत्सव साजरा केला जातो. माण तालुका सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने त्या जिल्ह्याचा आदर्श घेऊन आपणही शांततामय, पारंपरिक व डी.जे.मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. डी.जे. न लावता नियमांनुसार लाऊडस्पीकरचा वापर करावा. मंडळांनी रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान, शैक्षणिक व इतर सामाजिक उपक्रम राबवावेत. मंडळाच्या परिसरात सी.सी.टी.व्ही. बसवून उत्सवानंतर ते गावातील चौकात कायमस्वरूपी उपयोगात आणावेत. तसेच स्वयंसेवक नेमून गर्दी व वाहतूक व्यवस्थेसह महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करावे.” — रणजित सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी*
*“माण तालुक्यातील नरवणे गावाने गेल्या अनेक वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ हा स्तुत्य उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे.म्हसवड बिटअंतर्गत येणाऱ्या गावांतील गणेश मंडळांनी नरवणे गावचा आदर्श घेऊन गणेशोत्सव साजरा करावा.गणेशोत्सवातून गावातील एकोपा, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढीस लागला पाहिजे.मंडळांनी जमा होणारी वर्गणी केवळ उत्सवापुरती खर्च न करता समाजोपयोगी कामांसाठी वापरावी रक्तदान, वृक्षारोपण, शैक्षणिक मदत, अन्नदान यांसारखे उपक्रम राबवून गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड द्यावी.यातून गावाच्या विकासाला हातभार लागेल आणि गणेशोत्सवाचा खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण होईल.”— विक्रम शिंगाडे, सभापती, माण पंचायत समिती*








