आर्णीच्या तीज उत्सवात पुणे येथील नायक प्रेमकिसन राठोड यांचा भव्य सत्कार
प्रतिनिधी : कांताभाऊ राठोड
आर्णी येथील नायकांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सन्मान; हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत तीज-जवाराचे अरुणावती नदीपात्रात विसर्जन
आर्णी, दि. ५ सप्टेंबर २०२६ : बंजारा समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि पारंपरिक जीवनपद्धतीचे दर्शन घडविणारा आर्णी नगरीचा तीज-जवारा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आज शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी उत्सवाच्या नवव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने तीज-जवाराची तोडणी करून विधिवत विसर्जन करण्यात आले.
माधव नगर, आर्णी येथील संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात नायक, कारभारी, डाये-साण, नसाबी-हसाबी तसेच समाजबांधवांच्या उपस्थितीत तीज-जवाराची धार्मिक विधी पार पडली. तीज विसर्जन मिरवणुकीपूर्वी पुणे येथील नायक तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेमकिसन राठोड यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनाने उपस्थित समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आर्णी येथील नायकांच्या हस्ते प्रेमकिसन राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. तसेच आर्णीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार सर यांचाही नायकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यानंतर तीज-जवाराचे विधिवत पूजन करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. हजारो महिला भगिनी आणि भाविक भक्त पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. आर्णी शहरातील मुख्य मार्गावरून पारंपरिक बंजारा नृत्याच्या जल्लोषात मिरवणूक पुढे सरकत असताना संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तीज-जवारा उत्सवाला विशेष शोभा प्राप्त झाली.
मिरवणूक अरुणावती नदीपात्रात पोहोचल्यानंतर तीज-जवाराचे विधिवत पूजन करून श्रद्धापूर्वक विसर्जन करण्यात आले. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत ही समृद्ध परंपरा पोहोचविण्याचा संदेश देत उत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी आर्णीचे नायक रमेश नाईक, टी. डी. चव्हाण नायक, डॉ. विलास चव्हाण नायक, कारभारी तुकाराम राठोड, कैलास आडे, पुंडलिक राठोड, प्रकाश जाधव, सामाजिक कार्यकर्ते रंजीतभाऊ राठोड, प्रकाश राठोड, निलेश राठोड, बाबाराव राठोड, देविदास आडे, विपिनभाऊ राठोड, तसेच विनोद चव्हाण, रामसिंग जाधव, विजयसिंग दुलसिंग भाऊ राठोड, संभाजीनगर येथील कारभारी, नंदकुमार राठोड, संजय आडे सर, के. आर. चव्हाण, राजूभाऊ राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.
श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा आर्णीचा तीज-जवारा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.








