‘एनसीएमसी’ कार्डच्या सक्तीने प्रवाशांचा संताप; एसटी प्रवास बनला रोजच्या वादाचा आखाडा! महिला, ज्येष्ठ नागरिक त्रस्त
सवलतीच्या प्रवासासाठी कार्डची सक्ती कशासाठी? ‘एनसीएमसी’ पद्धत तातडीने बंद करण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी : सचिन सरतापे
म्हसवड : एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना या कार्डाच्या सक्तीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, सवलत मिळणे सोपे करण्याऐवजी शासनाने प्रवाशांच्या डोक्यावर नवा नियम लादल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.
एसटी बसमध्ये प्रवास करताना ‘एनसीएमसी’ कार्ड नसणे, कार्डमध्ये तांत्रिक अडचणी येणे किंवा कार्डच्या प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती नसणे यामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात दररोज वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. प्रवासाचा वेळ वाचविण्याऐवजी कार्ड तपासणी आणि नियमांच्या कटकटीत प्रवाशांचा वेळ जात आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र कार्डाच्या सक्तीमुळे त्यांनाच अधिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना तांत्रिक प्रक्रियेची माहिती नसते. अशा वेळी ‘कार्ड नाही तर सवलत नाही’ अशा परिस्थितीचा सामना करावा लागल्यास त्यांच्यावर आर्थिक भार पडतो.
महिलांनाही प्रवासादरम्यान कार्डासंदर्भातील अडचणींमुळे वाहकांशी हुज्जत घालण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सवलत ही प्रवाशांची सुविधा आहे की शासनाने लादलेली अडचण? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
‘प्रवाशांना सवलत द्या, कटकट नको!’
एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत प्रवास अधिक सुलभ करण्याऐवजी नियम, कार्ड आणि तांत्रिक प्रक्रियेच्या नावाखाली प्रवाशांना वेठीस धरणे थांबवावे, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांचे म्हणणे स्पष्ट आहे—“आम्हाला डिजिटल कटकट नको; आम्हाला सुलभ आणि सन्मानाने प्रवास करण्याचा अधिकार हवा.”
शासनाने प्रवाशांचा संताप ओळखावा!
‘एनसीएमसी’ कार्डाच्या सक्तीमुळे रोज प्रवासी आणि वाहक यांच्यात वाद निर्माण होत असतील, महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त होत असतील, तर या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
शासनाने केवळ कार्यालयीन नियम पाहण्याऐवजी प्रत्यक्ष एसटी प्रवाशांची परिस्थिती समजून घ्यावी आणि ‘एनसीएमसी’ कार्डाची सक्ती तातडीने बंद करावी, अशी मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.
“सवलतीच्या प्रवासासाठी प्रवाशांना रांगेत, कार्डाच्या कटकटीत आणि वाहकांशी वादात उभे करू नका. एसटी प्रवाशांसाठी आहे; प्रवाशांनी एसटीच्या नियमांसाठी त्रास सहन करण्यासाठी नाही!”








