२५ वर्षांच्या ज्ञानसेवेचा सन्मान – सौ. वैशाली सागावे (जाधव) यांना ‘गुरुगौरव पुरस्कार-२०२६’.
▪️येरगी नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा – शिक्षण विभाग, पंचायत समिती देगलूरकडून गौरव.
प्रतिनिधी: मनोज बिरादार
देगलूर : जि.प. शाळा येरगी येथील सहशिक्षिका सौ. वैशाली वामनराव सागावे (जाधव) यांना शिक्षण विभाग, पंचायत समिती देगलूर यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ‘गुरुगौरव पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
दि. ५ सप्टेंबर रोजी पंचायत समिती देगलूर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी बालाजी गोडाजी यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी हामिद दौलताबादी, कृष्णा तोटावार, केंद्रप्रमुख डी.एस. बिरादार, हणमंत जाधव, सुधाकर बोडके, पती डॉ. सुनील जाधव व मुलगा अनंता जाधव उपस्थित होते.
*२५ वर्षांची अखंड सेवा:* सौ. सागावे यांनी २००१ मध्ये जि.प. शाळा किणी येथून सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर बल्लूर, पेठ अमरापूर, जि.प. शाळा देगलूर, जाहूर हायस्कूल, मन्सरगा जुने आणि सध्या येरगी येथे अविरत ज्ञानदान केले आहे.
*“विद्यार्थ्यांचे कल्याण हेच माझ्या अध्यापनाचे अंतिम ध्येय आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून गेली २५ वर्षे मला सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचा आहे,”* असे सौ. सागावे यांनी सांगितले.
या पुरस्कारामुळे चालुक्यकालीन येरगी नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आदर्श सरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य व शालेय समितीने त्यांचे अभिनंदन केले आहे.








