क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य पुणे आणि सुलभ जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी : कांताभाऊ राठोड
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सुलभ जीवन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती आणि नवबोद्ध मुलांची शासकीय शाळा, पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम संपन्न.
दि. ०३ आणि ०४ सप्टेंबर, २०२६ रोजी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सुलभ जीवन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती आणि नवबोद्ध मुलांची शासकीय शाळा, पेठ, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे दोन दिवशीय युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक मा. खोसे सर यांनी कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना स्व- व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ह्या नेतृत्व शिबिराचा फायदा करून घेण्याचे आवाहन केले. साधनाताई घाटकर यांनी समाजमाध्यमांचा व्यक्तिमत्व विकासातील वाटा आणि भविष्यातील आव्हानांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले.श्री. मुख्तार शेख यांनी आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य आणि वर्तन तर श्री एकनाथ खंडागळे यांनी स्व विकासासाठी मनशांती, ताणतणाव व्यवस्थापन आणि अध्यात्म यांची जोड यांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
दुसऱ्या दिवशी श्री. हेमंत भागवत यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील उद्योजक कसे बनायचे आणि आवश्यक कौशल्याचा कसा विकास साधायचा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. अस्मिताताई मोरे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये स्व आणिक सामाजिक जाणिवांचा विकास कसा होतो व योग्य जाणीव कशाप्रकारे जोपासायची आणि वाढवायच्या याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना दृक- श्राव्य तसेच शाळेतील उपलब्ध साधनांचा वापर करून वक्त्यांनी अनेक अवघड विषय सोपे करून समजून दिले.
शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी हे शिबीर यशस्वी करण्यात सहकार्य केले त्याबद्दल सुलभ जीवन फौंडेशन च्या वतीने श्री. शंकर जाधव यांनी आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचा समारोप सर्वकृष्णन राधाकृष्णन यांना अभिवादन करून करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी हा नेतृत्व विकास आणि व्यक्तिमत्व विकास शिबीर कार्यक्रमातील सहभाग त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी नक्कीच दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असे मत शाळेचे शिक्षक श्री कोयते सर यांनी कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन आणि समारोपावेळी व्यक्त केले.








