सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या वर रायपूर पोलिसांची कारवाई
उज्वल जैस्वाल | प्रतिनिधी |
रायपूर : दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता रायपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना नितीन दिगंबर डुकरे, रा. सावरगाव डुकरे, ता. चिखली, जि. बुलढाणा हा व्यक्ती पोलीस स्टेशन रायपूर हद्दीतील ग्राम सातगाव भुसारी येथे सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या तलवार बाळगताना आढळून आला.
याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप पडघान, पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष काकडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अनंत कळमकर तसेच चालक पोलीस हवालदार लिंबाजी राठोड यांनी केली.
आगामी सार्वजनिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायपूर पोलिसांकडून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीं विरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.








